अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड येथील विद्यार्थ्यांनी कायदेविषयक ज्ञानाची सखोल माहिती घेण्यासाठी कुपवाड पोलिस ठाण्यास भेट दिली. पोलिसांसोबत संवाद साधला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह अंमलदारांशी संवाद साधत कायदेविषयक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील ठाणे अंमलदार, बारनिशी, गुन्हे, बिनतारी संदेश, कोठडी, मुद्देमाल, दफ्तरी व हजेरी या सर्व कक्षांच्या कार्याची सविस्तररित्या माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती पोलिसांनी निःसंकोचपणे दिली. प्रभारी अधिकारी कक्षात पोलिसांशी विद्यार्थ्यांच्या सवाल-जवाबाची चर्चा चांगलीच रंगली. भांडवलकरांसह संजय पाटील, प्रदीप भोसले, चांदणी दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.
भांडवलकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती व शारीरिक आरोग्यावर भर द्यावा. पालकांसह शिक्षकांचा सन्मान राखत ध्येय गाठावे. पोलिस समाजाच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळेच समाजात आढळणाऱ्या चुकीच्या घटना, उद्भवणाऱ्या समस्या व त्रास निर्धास्तपणे पोलिसांना सांगण्यास पुढाकार घ्यावा. त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ नंबरचा वापर करावा. छेडछाड, मुलींना त्रास देणे अशा घटना घडत असल्यास गोपनीयरीत्या संबंधितांची माहिती द्यावी. त्यांच्या बंदोबस्तासाठी खंबीर आहोत. "