शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थनेसोबत म्हटले जाणार नवीन गीत, राज्य सरकारने काढले आदेश

Admin

शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थनेसोबत म्हटले जाणार नवीन गीत, राज्य सरकारने काढले आदेश


मुंबई | 17 मार्च 2024 : शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा नियमित होत असते. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, यासाठी नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते. आता राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा समावेश त्यात केला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. त्यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून कळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

“जय जय महाराष्ट्र माझा…” या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र राज्य सरकारने दिला. वर्षभरापूर्वी हे गीत राज्यगीत झाले. त्यानंतर या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित ठाकरे यांनी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले अन् गायिले जावे अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली.

सर्व शाळांमध्ये केली सक्ती

अमित ठाकरे यांच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी झाला. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश / परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, “सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे, असे पत्रक राज्यशासनाने काढले आहे.